कन्नड–चाळीसगाव रस्त्यावर अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त

चाळीसगाव प्रतिनिधी कन्नड–चाळीसगाव मार्गावर प्रादेशिक व विभागीय वनपथकाने टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. ट्रकमध्ये सुमारे आठ टन निम व आडजातीचे लाकूड आढळून आले असून त्याची किंमत तब्बल दहा लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे.
वनपथक गस्त घालत असताना जिओ पेट्रोलपंपाजवळ संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान मोठ्या प्रमाणावर लाकूड आढळल्याने ट्रक जप्त करण्यात आला असून चालक मुदस्सर बेग (रा. मालेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध वृक्षतोड वाढीस लागल्याची चर्चा असून मालेगावातील काही व्यापारी गट नियमितपणे तालुक्यातून लाकूड वाहनांद्वारे बाहेर पाठवित असल्याचे स्थानिकांचे आरोप आहेत.
‘दिसूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे का?’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अवैध वृक्षतोडीवर कठोर कारवाई करून संबंधितांवर निर्भीड पद्धतीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.









