भुसावळ तालुक्यातील टहाकाळी फाट्यावर वरणगाव पोलिसांची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील टहाकळी फाटयावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे कट्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वरणगाव पोलीसांनी अटक करून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळ दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुस असे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील टहाकळी फाटाजवळ सार्वजनीक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची वरणगाव पोलीसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पो. निरिक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जितेंद्र जैन व पो कॉ योगेश पाटील यांनी टाहकळी फाट्यावर रविवारी दि. २३ जून रोजी रात्री ११:३० वाजता सापळा रचला. संशयित सागर प्रकाश डिके उर्फ सत्या (रा. टहाकळी ता. भुसावळ), आकाश विष्णू सपकाळे (रा. रायपूर ता. रावेर) या दोघांना यावेळी ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे २ गावठी बनावटीचा कट्टा-पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. एकूण ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दोघाना ताब्यात घेतले.
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोकॉ योगेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी सागर प्रकाश ढिके उर्फ सत्या, आकाश विष्णु सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपनिरिक्षक जितेंद्र जैन हे करीत आहेत.