जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यादरम्यान घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यामध्ये पुन्हा एकदा रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ‘हिट अँड रन’ ची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जबर धडक दिली. त्यानंतर कार पलटी झाल्यानंतर कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, यावेळी ग्रामस्थांचा मोठा रोष पाहायला मिळाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पिंगळे (वय वर्ष २० रा. गाडगेबाबा चौक, जळगाव), मयंक राजेंद्र चौधरी वय २१, रा. गणेशवाडी, जळगाव) आदित्य अनिल बिऱ्हाडे (वय २० वर्ष, रा. हरीविठ्ठल नगर,जळगाव) या तिघांसह जय पाटील (वय २०) आणि लोकेश राजपूत (वय २१, दोन्ही रा. जळगाव) असे पाच जण हे लाल रंगाची कार (एम एच १५ सीडी ८१९४) ने पद्मालय येथे गेले होते. (केसीएन)तेथून जळगावला परत येत असताना एका वाहनाला कारचा कट लागला. त्यावरून कारमधील चालकाने वाहन थांबवले. मात्र त्या ठिकाणी जमाव जमू लागल्यानंतर कार मधील कृष्णा पिंगळे, मयंक चौधरी, आदित्य बिऱ्हाडे हे तिघेजण घाबरल्याने त्यांनी कार वावडद्याच्या दिशेने भरधाव नेली. वावडदा चौफुलीवर सुमनबाई भिका राजपूत रा. वावडदे या महिलेला उडविले कार जळके व विटनेर दिशेने भरधाव वेगाने गेली यावेळी
दरम्यान वावडदा येथील लोकांनी विटनेर येथे फोन करून पळून जाणारी कार थांबवण्यासाठी जळके व विटनेर येथील ग्रामस्थांना सांगितले. पुढे तेथिल ग्रामस्थांनी बैलगाड्या आडव्या लावून कार थांबवण्याचा प्रयत्न केला. (केसीएन)तेव्हा कार पुन्हा रिव्हर्स घेऊन कार परत वावडदा दिशेने निघाली यावेळी कार मधील चालकाने जळके व वावडदा दरम्यान दुचाकी वरील पप्पू कदम राठोड रा रामदेवाडी या चालकाला धडक दिली. त्याआधी सुमनबाई भिका राजपूत (रा.वावडदे) या पायी जाणाऱ्या महिलेला धडक दिली. त्यात ही महिला जखमी झाली. तर जळके वावडदा दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
या घटनेत कारमधील तिघे मयंक चौधरी, कृष्णा पिंगळे आणि आदित्य बिऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना संतप्त जमावाने बाहेर काढले. यात ज्या दूचाकीला धडक दिली त्या दुचाकीवरील हिरामण उर्फ पप्पू कदम राठोड (वय ३० रा. रामदेव वाडी) हा देखील जबर जखमी झाला आहे. (केसीएन)दरम्यान कारमधील तिघांना बाहेर काढल्यावर काहींनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तात्काळ इतर ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना व जखमी दुचाकीस्वाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. रुग्णालयात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन जखमींची माहिती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.