मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिखली येथील रेशनदुकानदाराने आठ महिन्याच्या मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव पाटील यांना प्रशासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते. त्यांनी पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश गावडे (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे करीत आहेत .