रामानंद नगर पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): शहरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रामानंद नगर पोलिसांनी कंबर कसली असून, एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची ‘हिरो स्प्लेंडर’ मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

खंडेराव नगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर उखा भोई यांनी आपली हिरो स्प्लेंडर (क्रमांक एमएच १९ एएस ५२२४) ही दुचाकी घरासमोर उभी केली असता, अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती. याप्रकरणी दि. २५ रोजी रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलीस हवालदार सुशील चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, पिंप्राळा हुडको परिसरातील एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमीन शाह जहुर शाह (रा. न्यू दूध फेडरेशन, पिंप्राळा हुडको) याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला या संशयित आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक सखोल चौकशी आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, चालक पोलीस नाईक संदीप बिऱ्हाडे यांनी सहभाग घेतला. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. सुशील चौधरी हे करत आहेत.









