मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – येथील चौगुले प्लॉट परिसरातील सलून व्यवसायिक सुनील सुरेश टेमकर (वय ३६) याची अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली . पोलिसांनी ३ अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे . यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यापैकीच एकाने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे काल रात्री ही घटना घडल्यानन्तर सुनीलला उपचारांसाठी रुग्णालयात नेणारे नागरिक आणि त्यांच्या दोन भावांनी आज सकाळी ९ वाजेपर्यंत घरी आजी , आई , सुनीलची पत्नी , त्याच्या मुलांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली नव्हती . आज सकाळी अचानक ही दुर्दैवी व धक्कादायक घटना माहिती झाल्यावर सुनीलच्या आई आणि पत्नी शोकविव्हळ झाल्या होत्या . त्यांचा आर्त आक्रोश उपस्थितांच्या काळजाला पीळ पाडणारा होता.
जळगाव ते ममुराबाद रस्त्यावर प्रजापत नगर येथील सुनील टेमकर यांचे चौगुले प्लॉट परिसरात दाढी – कटिंगचे दुकान आहे. काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून काही दिवस सलूनचे दुकान बंद होते. रविवारी त्याने दुकान पुन्हा उघडले होते . काल रात्री दुकान बंद होण्याची वेळ असताना २ अनोळखी लोकांनी दुकानात येऊन त्याला ब्लेड मागितले . त्याने ब्लेड मागणारांना नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला या वादात या अनोळखी लोकांनी त्याच्यावर शस्त्राने वार केले त्याला गंभीर दुखापत झाली होती. आजूबाजूच्या नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेचा घटनाक्रम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाल्याने त्या आधारावर पोलीस संशयितांपर्यंत पोहचले .
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व शनिपेठ पोलिस ठाण्याचे पो नि बळीराम हिरे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले . त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सहकाऱ्यांना तपासाबद्दल सूचना दिल्या होत्या . पोलिसांनी ३ अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे . यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचेही प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे . यापैकी एक संशयित यापूर्वीही काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या ताब्यात होता . त्याला पोलिसांनी रिमांड होममध्ये पाठवले होते . तेथेही तो अन्य अल्पवयीन संशयितांना विनाकारण मारहाण करायचा . त्याची वर्तणूक सर्वसाधारण नसल्याने पोलिसांनाही त्याने जेरीस आणले होते , अशी चर्चा आहे . सध्या तो जामिनावर मुक्त झालेला होता .
सुनील टेमकर यांच्या पश्चात आई नलीनी टेमकर , पत्नी योगीता टेमकर , मुलगा रोनक टेमकर ( वय ७ ), मुलगी दिप्ती (वय 5 ) , भाऊ कल्पेश व पंकज टेमकर , आजी चमीला टेमकर असा परिवार आहे .