रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
म्हसावद जवळील घटना ; एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत एका वृद्धाने जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद गावाजवळ शनिवारी (दि. १३ डिसेंबर) रात्री घडली. विठ्ठल श्याम बाविस्कर (वय ६५, रा. वाकडी, ता. जळगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल बाविस्कर हे रात्रीच्या सुमारास म्हसावदनजीक रेल्वे रुळांवर आले होते. त्याचवेळी धावत्या रेल्वे समोर त्यांनी अचानक स्वतःला झोकून दिले. रेल्वेच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरुवातीला रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.









