यावल (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कासारखेडा येथे चार ठिकाणी चोरटयांनी डल्ला मारला असून हजारोंचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात चोर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंबा पुना कुंभार यांच्या राहत्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. निंबा पुना कुंभार हे विट व्यवसायाच्या कामासाठी घराला कुलूप लावून गुजरात राज्यांतील सुरत येथे आपल्या परिवारासह गेले होते. शनिवार दि. २२ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाट तोडून कपाटात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने व घरातील संसारोपयोगी पितळी भांडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.
निंबा कुंभार यांच्या राहत्या घरातील दरवाज्याचे कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व साहित्यांची तोडफोड करून गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून कपाटात असलेले दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. घरातील साहित्य पत्री पेटी उचलून शेजारीच असलेल्या शेतात फेकून दिलेले आढळून आले. त्या ठिकाणी कपडे व इतर जिन्नस ठेवलेल्या वस्तू पडलेल्या आढळून आल्या.
श्रीराम तापीराम न्हावी यांचे टीव्ही मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिकचे दुकान फोडून त्या ठिकाणावरुन ही इलेक्ट्रिक मोटर व इतर साहित्य चोरून नेले आहे. श्रीसंत तुकाराम महाराज मंदिर येथील दानपेटी चोरून नेली. घटनास्थळी उपनिरीक्षक खैरनार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक खैरनार , पो हे.कॉ .नरेन्द्र बागले, अजित शेख , करीत आहेत.