शिरसोली मारहाणप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे १० जणांच्या टोळक्याने गावात दहशत माजवीत ३ जणांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घेण्याचा कारणावरून धारदार शस्त्राने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना बुधवार दि. १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भगवान राजाराम पाटील (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. ते परिवारासह शिरसोली येथे अशोक नगरात राहतात. बुधवार दि. १६ रोजी संध्याकाळी ७ वाजता ते शिरसोली येथील यशोनंदन डेअरीवर दूध देण्यासाठी गेले असताना त्यांना भाचा भूषण पाटील यांचा फोन आला. (केसीएन)विशाल भिल व दीपक भिल हे घरी आले असून ते भांडण करीत आहेत. त्यानुसार फिर्यादी भगवान पाटील हे लगेच घराकडे गेले. त्या ठिकाणी त्यांचे वडील राजाराम शिवराम पाटील, भाचा भूषण बाळू पाटील, काका अजय जयराम पाटील हे जखमी अवस्थेत दिसले.
भूषण पाटील याने सांगितले की, सायंकाळी साडेसहा वाजता भूषण पाटील आणि फिर्यादीचे वडील राजाराम पाटील हे घराच्या अंगणात बसलेले असताना गावातील विजय भील, सुखदेव भिल, विशाल भिल, दीपक विठ्ठल भिल, आकाश संजय नागपुरे, नितीन भिल, सुभाष भिल, सचिन भील, गजानन भिल, अजय भिल हे १० जण घरी आले होते.
त्यांनी शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारला असता त्यांनी मारहाण केली. यामध्ये गजानन भिल याने हातातील चॉपरने भूषण याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले तर अजय भिल याने लाकडी दांडक्याने भूषणला मारहाण केली. तसेच सचिन भिल याने लोखंडी हातोडीने रांजाराम पाटील यांना पाठीवर, पोटावर मारहाण केली.(केसीएन)भांडण सोडण्यासाठी आलेले अजय जयराम पाटील यांना सुद्धा मारहाण, शिवीगाळ करून सुभाष भील याने अजय पाटील यांच्या डोक्यावर कोयता मारून गंभीर जखमी केले.
त्यावेळेला इतर ग्रामस्थ धावून आल्यानंतर टोळके पसार झाले. ग्रामस्थांनी व फिर्यादीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला वरील १० संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.