रावेर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्याशी बालविवाह लावून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रावेर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित १३ वर्षीय मुलगी ही रावेर तालुक्यातील एका एमआयडीसी परिसरात वास्तव्यास आहे. १ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत संशयित आरोपी मिथुन रेमसिंग महाता (रा. बकडी, ता. नेपानगर, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याने पीडितेच्या अल्पवयीन असण्याचा फायदा घेऊन तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्याशी बालविवाह करून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. या अत्याचारातून पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे.
पीडितेने एका बालकाला जन्म दिल्याची माहिती बेळगाव (कर्नाटक) येथील बिम्स (बीम्स) हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली. त्यांनी सखी-१ स्टाफच्या मदतीने चौकशी केली असता, हा गंभीर प्रकार उघड झाला. सुरुवातीला बेळगाव येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात ‘शून्य’ क्रमांकाने गुन्हा नोंदवण्यात आला होता, जो पुढील तपासासाठी रावेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
रावेर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३: कलम १३७(२), ६५(१), ६४(२)(M), पोक्सो (POCSO) कायदा २०१२: कलम ४ व ६, बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६: कलम ९ व ११ कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.









