धरणगाव तालुक्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील पाळधी येथील गोविंद नगर परिसरात एका रिक्षा चालकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सैय्यद अरमान सैय्यद कुरबान (वय ६२, रा. गोविंद नगर, पाळधी), जे व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक आहेत, त्यांचे घर बंद असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी स्टोअर रूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला. चोरट्यांनी एकूण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत. धरणगाव परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.









