चोपडा तालुक्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी): चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मंगरूळ शिवारात विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मंगरूळ शिवारातील हतनूर पाट चारी ते माचला पाट चारी दरम्यान असलेल्या ‘अग्रवाल पॉवर प्रा. लि.’ कंपनीच्या मालकीच्या विद्युत खांबांवरून ही चोरी झाली आहे. दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ते २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी एकूण २५ गाळ्यांवरील सुमारे ३६५० मीटर लांबीची ॲल्युमिनियम धातूची विद्युत वाहक तार चोरून नेली. या चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ७५,००० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी योगेश अंकुश पाटील (वय ३०, रा. गारखेडा, ता. धरणगाव), जे एम.ई.सी.बी. मध्ये कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत, यांनी २७ जानेवारी २०२६ रोजी अडावद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद तात्यासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









