यावल तालुक्यात घटना
फैजपूर (प्रतिनिधी) : पीडित महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे दुसरे लग्न होऊ नये, या कुत्सित हेतूने तिच्याच पूर्व पतीने पीडितेचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाला आहे. पीडितेचे दुसरे लग्न होऊ नये या उद्देशाने, संशयित आरोपी अजय मुकुंदा भटकर (वय २६, रा. निपाणी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) याने नोव्हेंबर २०२५ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत पीडितेची बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले. आरोपीने पीडितेचे त्याच्यासोबत असलेले जुने फोटो अश्लील स्वरूपात मॉर्फ केले (त्यात छेडछाड केली). हे अश्लील फोटो त्याने त्याच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पीडितेच्या संमतीशिवाय पोस्ट केले. या कृत्यामुळे पीडितेच्या विनयभंग होऊन तिची समाजात मोठी बदनामी झाली आहे.
पीडित महिलेने २७ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तपास चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.









