अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई
अमळनेर प्रतिनिधी – शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांनी धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाचा (डम्प डेटा) आधार घेतला. या तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज शेख साजीद मनियार (वय २८, रा. धुळे) याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने अमळनेर आणि इतर परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या गाड्या धुळे शहरात लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी धुळ्यातून तीन दुचाकींचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोउपनि शरद काकळीज, मिलींद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद सोनवणे, गौरव पाटील आणि मिलींद जाधव यांचा समावेश होता. पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील आणि मिलींद सोनार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









