नंदुरबार शहरात घडली घटना


पारोळा (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्हा कारागृहाजवळील परिसरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
हर्षल हनुमंत पाटील (१२, रा. हनुमंतखेडे, ता. पारोळा) असे मयत बालकाचे नाव आहे. हर्षल हा दुधाळे शिवारातील हनुमाननगरात राहणाऱ्या आत्याकडे शिक्षणानिमित्त राहत होता. तो नंदुरबारातील के. आर. पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. रविवारी हर्षल हा नातेवाइकांसह गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेला होता. याठिकाणी पोहोण्याचा आनंद घेत असताना खोल पाण्यात बुडाला. परिसरातील युवकांनी उड्या टाकून त्याला बाहेर काढले.
मात्र त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीराम आनंदा पाटील, रा. आष्टे यांनी तालुका पोलिसात खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान रुग्णालयामध्ये कुटुंबीयांनी आक्रोश केला होता.









