जळगावात गणेश कॉलनीतील सहकारी संस्थेत प्रकार उघड
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात असलेल्या दुसरे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (साखर) कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीने तब्बल ४९ हजार ३८ रुपये ५० पैसे इतकी रक्कम अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दि. २९ जानेवारी २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील सहकारी संस्थेच्या कार्यालयात हा प्रकार घडला.

फिर्यादी मोहन वेरांग्या पवार (रा. विनायक पार्क बिल्डिंग, दादावाडी परिसर, जळगाव) हे कार्यालयीन कामात व्यस्त असताना आरोपीने त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड घेतले.त्यानंतर क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली फिर्यादीच्या नावाने नवे क्रेडिट कार्ड बनवून, त्यावर स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट करण्यात आला. या कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवहारांतून १,०२५ रुपये, २५,६२५ रुपये, १०,११८ रुपये (दोन वेळा), ४१० रुपये व १,७४२.५० रुपये अशी एकूण ४९,०३८.५० रुपये रक्कम काढून घेण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३५८/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३१८(४) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. भटू पाटील करीत आहे.









