नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- कोरोनाच्या विविध स्ट्रेनमुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून, मृतांचा आकडाही वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक असून, परिस्थिती बिकट झाल्याचे चित्र आहे. रुग्णावाढीबरोबरच देशात मृत्यूचे थैमानही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. देशात २४ तासांत अडीच हजारांहून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे.

एका दिवसांत आढळून आलेल्या जागतिक रुग्णवाढीचा विक्रम मोडीत निघाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) जाहीर केली असून, ही माहिती सगळ्यांनाच काळजीत टाकणारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात २ हजार ६२४ जणांचे प्राण कोरोनामुळे गेले आहेत. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात २४ तासांच्या काळातच २ लाख १९ हजार ८३८ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या २५ लाख ५२ हजार ९४० रुग्ण उपचार घेत आहेत.







