जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिव कॉलनी येथील ९१ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचार घेत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला. कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेत हा दहावा मृत्यू आहे.
कोरोना महामारीची तिसरी लाट सुरू झाली आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असल्यामुळे या लाटेमध्ये रुग्ण गंभीर होण्याची तसेच दाखल होण्याची स्थिती नाही. त्यामुळे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोहाडी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल केले जात आहे.
तसेच अतिगंभीर रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जुना अतिदक्षता विभाग येथे दाखल केले जात आहे. शनिवारी २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता शिव कॉलनी येथील ९१ वर्षीय महिलेला कोरोनाबाधित असल्यामुळे व प्रकृती खालावल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, कोरोना महामारीच्या या तिसऱ्या लाटेमध्ये हा दहावा मृत्यू असून एकूण तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे आणि स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.