जळगाव (प्रतिनिधी ) – सावखेडा शिवारात असलेल्या आर्यन इको रिसॉर्टमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाने ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.
सावखेडा शिवारातील आर्यन इको रिसॉर्ट येथे शनिवारी दुपारी एका कंपनीचा सेमिनार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी ५० लोकांची परवानगी असताना अचानक मोठी गर्दी उसळली. रस्त्यावर आणि बाहेर वाहनांची व नागरिकांची गर्दी दिसून येत असल्याने याबाबत पोलिसांनी माहिती मिळाली. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार पथकासह त्याठिकाणी पोहचले.
मनपा उपायुक्त शाम गोसावी यांच्या पथकातील अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, किशोर सोनवणे व इतर आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपनिरीक्षक कल्याण कासार, उपनिरीक्षक सायकर, हवालदार वासुदेव मराठे, विश्वनाथ गायकवाड, अनिल तायडे, मनोज पाटील, अशोक पाटील यांच्यासह केलेल्या पाहणीत कार्यक्रमाला २०० पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असल्याचे आढळून आले. तसेच कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.