मुंबई (वृत्तसंस्था ) करोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. त्यासोबतच, रेल्वे प्रवास, होम आयसोलेशन, क्वारंटाईनचा कालावधी या बाबतीत देखील सूट मिळावी, अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे राज्यातील मृतांचा आकडा अद्याप नियंत्रणात येताना दिसत नाही. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल २०० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०३ टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता १ लाख २५ हजार ०३४ इतका झाला आहे. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ५९९ मृत्यू हे एकट्या मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये झाले आहेत.
एकीकडे मृतांचा आकडा वाढलेला असताना दुसरीकडे राज्यात नव्याने सापडणाऱ्या करोना बाधितांचा आकडा मात्र अजूनही १० हजारांच्या खालीच आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही काहीशी दिलासादायक बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ९९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांची संख्या ६१ लाख ४० हजार ९६८ वर गेली आहे.
दरम्यान, राज्यातल्या आजपर्यंतच्या एकूण करोनाबाधितांपैकी ५९ लाख ४४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात १० हजार ४५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे.