नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार २९३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तर या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३ हजार २९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ वर पोहचली आहे.
मंगळवारी महाराष्ट्र सर्वात ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी सोमवारी ४८ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. तर केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मागील २४ तासात ३० हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहे. उत्तर प्रदेशात ३२ हजार ९२१, तर केरळ मध्ये ३२ हजार ८१९ आणि कर्नाटकात ३१ हजार ८३० कोरोनाबाधित आढळले आहेत.
बंगळुरू या शहरात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ६ हजार २२३ आहे. आतापर्यंत या शहरात ६ लाख ८७ हजार ७५१ जण कोरोनाबाधित झाले आहेत. यातील ४ लाख ७५ हजार ५२५ जण बरे झाले आहेत. तर ६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दुसऱ्या नंबरवर पुणे शहर आहे, येथे १ लाख ४ हजार ५६१ सक्रीय रुग्ण आहेत. तर दिल्लीमध्ये ९८ हजार २६४ सक्रीय रुग्ण आहेत.







