म्हसावदमध्ये दोन घरांसह दानपेट्या फोडल्या
म्ससावद (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील म्हसावदमध्ये चोरांनी धुमाकूळ घातला असून, दोन घरांसह मंदिराच्या दानपेट्या फोडण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. यामुळे मंदिरांच्या सुरक्षेवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया लुटल्याची घटना ताजी असताना शहरात वर्दळीच्या ठिकाणी चो-या दिवसेंदिवस वाढतच आहे.
म्हसावद गावात चोरांनी मध्यरात्री धुमाकूळ घातला. गावातील गिरणेश्वर महादेव मंदिरात शिरलेल्या चोरांनी दानपेटी फोडत रोकड लांबवली. हा प्रकार सकाळी भाविकांच्या निदर्शनास आला. मंदिराची दानपेटी फोडून अंदाजे ५० हजारांची रोकड चोरांनी लांबवली. यानंतर चोरांनी शिवकॉलनीतील लमांजन रस्त्यावरील महावितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ असलेल्या गजानन मंदिरात शिरलेल्या चोरांनी दानपेटी फोडून रोकड लांबवली. याशिवाय लोकवस्तीकडे मोर्चा वळवला. किरण शिवदे हे घरात समोरच्या खोलीत कुटुंबासह झोपले होते. मध्यरात्री बेडरुम मागील खोलीच्या खिडकीचे गज वाकवून चोरटे आत शिरले. यानंतर चोरांनी बेडरुमच्या कपाटातील २० ते २५ हजाराची रोकड लांबवली. तर याच परिसरातील रवींद्र म्हस्के हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी कपाटाच्या ड्रॉवरमधून २० ते २२ हजाराची रोकड लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.