जळगाव (प्रतिनिधी) : पोलिस असल्याचे सांगून महामार्गावर सोफे विकत असलेल्या एका गरीब सोफेविक्रेत्याची दुचाकी घेऊन एका भामट्याने पोबारा केल्याची घटना रविवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख असिफ शेख मुनाफ (वय ३२, रा. ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको) यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. तो राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल चौकाच्या पुढे सोफे विकण्याचे काम करतो. रविवारी दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता एक अज्ञात इसम तेथे आला. त्याने पोलीस कटिंग केलेली होती. पायात पोलिसांच्या बुटासारखे बूट होते. शेख असिफ यास भामट्याने त्याच्याकडील ओळखपत्र दाखविले. ओळखपत्रावर पोलिस दलाचा सिम्बॉल होता. त्यामुळे नाव आसिफ व्यवस्थित पाहू शकला नाही.
त्या भामट्याने आसिफ याला सांगितले की, मी नगर येथील पोलीस आहे. ८ वर्ष मुलीवर बलात्कार झाला असून मी त्याचा तपास करीत आहे. मला येथे थोडा वेळ बसू दे म्हणून तो १२ ते ३ झोपला. त्यानंतर ३ वाजता उठून चहा पाणी घेतल्यानंतर त्याने जवळपास फेऱ्या मारल्या. संध्याकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जायचे आहे सांगून आसिफ यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ ए वाय ८२३२ मागितली.
आसिफने त्यास दुचाकी दिली. मात्र बराच वेळ झाला, तो अज्ञात इसम दुचाकी घेऊन आलाच नाही. त्यामुळे आसिफने त्याच्या मित्रांच्या मदतीने गावात दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुचाकी काही मिळाली नाही. त्यानंतर त्याने त्या भामट्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान या घटनेमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तो पोलिस खरा की तोतया हे शोधण्याचे काम आता पोलिसांपुढे आहे.