‘पब्लिक मार’ मध्ये गोळीबार करणारा पिता जखमी ; चोपडा शहरातील हळदीच्या कार्यक्रमातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात प्रेमविवाह केल्याच्या रागातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पित्याने मुलगी व जावईवर गोळीबार गेला. यात मुलीचा मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाला आहे. तर उपस्थित नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या पित्याला पब्लिक मार दिल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तृप्ती अविनाश वाघ (वय २५, रा.डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे मयत तरुण विवाहितेचे नाव आहे. तर तिचे पती अविनाश ईश्वर वाघ (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहे. मयत तृप्ती वाघ हिच्या सासू प्रियंका ईश्वर वाघ (वय ४५ रा. पुणे) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यातून अविनाश वाघ व त्याचा परिवार आला होता. याबाबतची माहिती संशयित आरोपी तथा अविनाश वाघ यांचे सासरे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी किरण अर्जुन मंगळे (वय ५५ रा. शिरपूर जि. धुळे) यांना मिळाली होती. त्यांनी चोपडा येथे येऊन शनिवारी दि. २६ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ यांच्यावर परवाना असलेल्या बंदुकीतून बेछूट गोळीबार केला.
यात मुलगी तृप्ती वाघ ही जागीच मृत्युमुखी पडली तर जावई अविनाश याला पाठीवर व हातावर गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संतप्त होऊन संशयित आरोपी किरण मंगळे याला बेदम मारहाण करून पब्लिक मार दिला.(केसीएन)चोपडा शहर पोलिसांना घटनेची माहिती करताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी तृप्ती वाघ हिचा मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला तर जावई अविनाश वाघ व जखमी किरण मंगळे यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण अर्जुन मंगळे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा निखिल किरण मंगळे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेमुळे चोपडा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे स्वतः करीत आहेत.