जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव कंटेनरने दुचाकीला कट मारल्याने दुचाकी घसरून तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी ४ जून रोजी रात्री महामार्गावर शिव कॉलनीजवळ झाला. रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित श्रीराम बारी (३०, रा. हरिविठ्ठल नगर) हे गंभीर जखमी झाले. फुले मार्केटमध्ये कापड व्यवसाय करणारे रोहित बारी हे बुधवारी रात्री दुचाकीने (एमएच १९, डीके २७९०) घरी जात होते. मागून येणाऱ्या कंटेनरने (एमएच १९, सीएक्स २२५९) दुचाकीला कट मारला. त्यामुळे दुचाकी घसरली व रोहित हे खाली पडले. त्यांच्या पोटाला, डाव्या पायाला, कंबरेला व इतर ठिकाणी दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. तरुणास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले. रोहित बारी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ हेमंत कळसकर करीत आहेत.