जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस पक्ष हा बालेकिल्ला समजला जायचा . कालांतराने राष्ट्रवादी, भाजप आणि आता शिवसेना असे जिल्ह्यातील स्वरूप बदलत गेले. मात्र काँग्रेसचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून आ.शिरीष चौधरी यांच्या रूपाने एकमेव आमदार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका आदी निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार नगण्य प्रमाणात निवडून आले आहेत. तसेच काँग्रेस पक्षात किंबहुना निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असलेली मरगळ आता दूर व्हायला लागली असल्याचे चैतन्यमय असे वातावरण निर्माण झाले आहे. फैजपूर येथे झालेले काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले होते. त्याच ऐतिहासिक भूमीतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्याला प्रारंभ केला होता. जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील जुने , निष्ठावान कार्यकर्ते , नेते यांच्यामध्ये असणारी गटबाजी , हेवेदावे बाजूला सारून काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी नाना पटोले यांनी आपल्या विविध ठिकाणी झालेल्या भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकर्त्यांनीही जोमाने कामाला लागण्याचे आणि घराघरात पक्षाचे चिन्ह ‘पंजा ‘ पोहचविण्यासाठी एकत्र येऊन त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्याचे सूतोवाच काँग्रेसच्या नेत्यांनी दिले. या आवाहनाला तितक्याच जोमाने प्रतिसाद देऊन काँग्रेस कार्यकतें नेते आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजय प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सज्ज झाल्याचे चित्र नाना पटोले यांच्या दौऱ्यात दिसून आले. नाना पटोले यांनी स्वबळाचा नाराही दिला आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीत तरुणांना संधी देऊन खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत . निवडणुकांमध्ये पक्षासाठी झोकून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून अशा निष्ठावंत कार्यकर्ते कामालाही लागले आहे. सध्यातरी काँग्रेस पक्षाची यावल,रावेर, चोपडा , अमळनेर, जामनेर आदी ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना अधिक जोर लावून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहे. आ. शिरीष चौधरी , माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिपभैय्या पाटील यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी ,जुने नवे निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी तयार ठेऊन इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला लयभारी ! ; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आली नवी ‘उभारी’ असेच चित्र निर्माण झाल्याचे म्हणावे लागेल.