लखनौ (वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेश विधानसभा निवडुणकीत काँग्रेसचा दुसरा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार यावर प्रियंका गांधींनी मजेशीर उत्तर दिले. तुम्हाला दुसरे कुणी दिसतात का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
यूपीच्या जनतेसाठी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांचे मॅनिफेस्टो अर्थातच जाहीरनामा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने युवा पिढी आणि महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला आहे. आपण युवकांशी संवाद साधूनच हा जाहीरनामा बनवल्याचा दावा यावेळी प्रियंका गांधींनी केला. यानुसार, उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यास 20 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या जातील. त्यातील 8 लाख जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील. विशेष म्हणजे, राज्य सरकारमध्ये 12 लाख पदे आताच रिक्त आहेत. त्यामुळे, नोकऱ्या देण्याचे काम झपाट्याने सुरू केले जाईल असे प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या आहेत.