मुंबई: ( प्रतिनिधी ) – प्रियंका गांधी लखीमपूर येथे पीडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना रोखण्यात आलं. आधी नजरकैदेत ठेवलं नंतर अटक करण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले म्हणाले , 4 ऑक्टोबर 1977ला त्यावेळेसच्या जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती होत आहे. प्रियंका गांधी यांना अटक करून भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेस जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार आहे. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत, असं पटोले म्हणाले.
देशात सध्या पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात देश पेटलेला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावरून माघारी परतावं लागलं. त्यांनाही जाऊ दिलं नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरताना दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी अकोला बँक निवडणुकीवर बोलण्यास नकार दिला. बच्चू कडू हे अपक्ष आमदार असून ते शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. आम्ही जास्त त्यावर बोलणार नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतात, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. आतापर्यंत जो कल आपण पाहतोय ते पाहता भाजप मागे पडला आहे. अजून निकाल यायला वेळ आहे. पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर आहे, असा दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर बनवीरपूर गावात जायचं होतं. मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.







