(सोनम पाटील)

जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) महिलेचा विनयभंग केल्याच्या संशयावरून एका तरुणाला जमावाकडून शिवीगाळ करण्यात आली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जळीत कक्ष क्रमांक १० मध्ये दाखल रुग्णाला एका सरकारी योजनेची माहिती देण्यासाठी हा तरुण गेला होता. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईक महिलेशी संवाद साधला. त्यावेळी या तरुणाने अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याचे महिलेचे म्हणणे होते. त्याबाबत संबंधित तरुणाला जनसंपर्क कक्षात जाब विचारण्यासाठी नातेवाईक व नागरिकांचा जमाव जमला होता.
यावेळी त्या तरुणाने त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने प्रचंड शिवीगाळ केली. त्यावेळी जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर महिलेचे नातेवाईक जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी निघून गेले. तेथे घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते. या प्रकारची दिवसभर एकच चर्चा होती.







