अधिकारी, डॉक्टरांमध्ये काहीशी निराशा ; रुग्णसेवेचा उंचावलेला स्तर खाली आल्याचे चित्र !

जळगाव (प्रतिनिधी) – नागपूर येथील डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा एकतर्फी पदभार १३ सप्टेंबर रोजी घेतला. महिन्याभरात रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकण्यात ते अपयशी ठरल्याचे दिसत असून रुग्णालयातील सेवांचा उंचावलेला स्तर देखील आता खाली आला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव सामान्य गरीब नागरिक पुन्हा खाजगी डॉक्टरांच्या दावणीला बांधले जात असल्याचे निराशाजनक चित्र रोज दिसून येत आहे.
डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगाव येथे प्राध्यापक, शरीररचना शास्त्र या रिक्त पदी नियुक्ती तसेच अधिष्ठाता पदाचा जळगावात अतिरिक्त पदभार घेण्याबाबत २६ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आदेश काढले होते. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी, प्राध्यापक, शरीररचना शास्त्र हे पद जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रिक्त नाही म्हणून वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दोन पत्रांद्वारे कळविले. ७ सप्टेंबर रोजी अधिष्ठाता पदाचा पदभार घेण्यासाठी आलेले डॉ. फुलपाटील यांनाही डॉ. रामानंद यांनी याबाबत माहिती दिली. तरीही ९ ऑक्टोबर रोजी, डॉ. रामानंद यांनी शासन आदेशाचे पालन न करता अधिष्ठाता पदाचा पदभार सुपूर्द केलेला नाही असे डॉ. फुलपाटील यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सचिवांना कळविले होते.
पुढील ३ दिवस सरकारी सुटी संपल्यावर सोमवारी १३ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी थेट अधिष्ठात्यांच्या खुर्चीवर बसत एकतर्फी पदभार घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हा पदभार घेतल्यानंतर आज महिन्याभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची अपेक्षित प्रगती झालेली दिसत नाही. तसेच यापूर्वी जे अनपेक्षित बदल डॉ. रामानंद यांच्या काळात झाले त्या बदलांना आता तिलांजली दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. भौतिक सुविधा, सुशोभीकरण, बदलाची मानसिकता या ३ पातळ्यांवर डॉ. रामानंद यांनी कौतुकास्पद बदल केले होते.
रुग्णालयात अधिकारी, डॉक्टर्स, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांचा कामाविषयी आत्मविश्वास कमी होत असल्याचे दिसत आहे. रुग्णसेवा देखील ढासळत चालली असून सर्वसामान्य माणसांना दाद दिली जात नाही. रुग्णालयात उपचारांविषयी आणि सुविधांबाबत व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांचे हेलपाटे सुरु आहेत. अधिष्ठाता डॉ. फुलपाटील यांचे रुग्णालयातील राऊंड पूर्णपणे बंद झाले असून कक्षांत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिकांच्या समस्या ऐकून घ्यायला कोणी अधिकारी राहिलेला नाही. अधिष्ठाता डॉ. फुलपाटील हे कार्यालयीन १० ते ६ या वेळेतच त्यांच्या कक्षात असतात. त्या पलीकडे ते रुग्णालय किंवा महाविद्यालयाकडे फारसे पाहण्यास तयार नाहीत असे निराशाजनक चित्र दिसून येत आहे.
नवनियुक्त वैद्यकीय अधीक्षकांचे देखील रुग्णालयात काहीसे दुर्लक्ष असल्याने व विविध कक्षांमध्ये ते फक्त उपचार करण्यापुरता येत असल्याने नाराजी वाढली आहे. नातेवाईकांशी परिचारिका, डॉक्टरांचे रोज एक तरी वाद होत आहे. ओपीडी काळात होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. अनेक ठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही समस्या आहेत. हे सर्व नियंत्रण व नियोजन करण्यात डॉ. मिलिंद फुलपाटील अपयशी ठरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.







