डॉक्टरांना मारहाणीच्या घडल्यात घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या दुचाकी आणि इतर वस्तू चोरीला गेल्याच्या घटना मागे घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे कमर्चाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्याने गैरसोय होत आहे आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वी रुग्णालयांत डॉक्टराना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाणीचे प्रकार घडले आहेत. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे सध्या वॉर्ड बॉय, परिचारिका, डॉक्टर यांना अनेकदा तणावाखाली काम करावे लागत आहे.रुग्णाच्या केवळ उपचाराची जबाबदारी नाही; तर काही वेळेस रुग्ण व आक्रस्ताळी भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांना नियंत्रणात ठेवण्याचे अतिरिक्त दडपणही त्यांच्यावर येत आहे. काही वेळेस तातडीचे रुग्ण रुग्णालयात आणले जातात. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता अधिक असते. या रुग्णालयाचे महत्त्व लक्षात घेता येथे किमान प्रत्येक पाळीमध्ये दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णालयात कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये, सुरक्षा व्यवस्था उधारीवर आणलेल्या सुरक्षा रक्षकांवर अवलंबून आहे.