शासकीय रुग्णालयातील बेपर्वा कारभारामुळे डॉक्टर्स वैतागले
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन दहा दिवसांपासून बंद असल्याने गोरगरिबांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. शस्त्रक्रियागृह व कक्ष क्रमांक १३ मधील पाणी गळतीमुळे २ कोटी २० लाख रुपयांची मशिनरी धूळ खात पडली आहे. अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले यांचेसह क्ष किरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अंजली वासडीकर यांचे गंभीर दुर्लक्ष झाले आहे. रुग्णालयातील इतर रुग्णसेवेतील त्रुटींबाबत बेपर्वा कारभार सुरु असल्याने डॉक्टर्स, कर्मचारी देखील वैतागले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिटी स्कॅन, सोनोग्राफी हे क्ष किरणशास्त्र विभागाच्या अंतर्गत सुरु होते. यातील सोनोग्राफी विभाग हा तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने सुरु आहे. मात्र सिटी स्कॅन विभाग गेल्या दहा दिवसांपासून बंद पडलेला आहे. त्यामुळं गरीब रुग्णांचे हाल सुरु असून खाजगी दवाखान्यात हजारो रुपयांचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
क्ष किरणशास्त्र विभागात प्रमुख डॉ. अंजली वासडीकर यांच्याशिवाय आता डॉ. सतीश महाजन, डॉ. पूनम केसगिरे, डॉ. प्रतीक घुले हे कार्यरत आहेत. तर डॉ. उत्कर्ष पाटील, डॉ. पराग गारसे, डॉ;दीप्ती पाटील यांनी रुग्णालयाच्या बेपर्वा कारभारामुळे मुदत संपल्यानंतर रुग्णालय सोडून गेले असल्याची माहिती मिळाली आहे. डॉ. अंजली वासडीकर या विभागात नियमित येत नसून त्यांचे त्यांच्या क्ष किरणशास्त्र विभागाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
याबाबत अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले हेदेखील या गंभीर समस्येकडे पाहण्यास तयार नाहीत. त्यामुळे रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांची सिटी स्कॅन मशीन व सेटअप हा धूळखात पडला असून शस्त्रक्रियागृह व कक्ष क्रमांक १३ मधील पाणी गळतीमुळे सिटीस्कॅन कक्षाची दुर्दशा झालेली आहे. या कक्षाच्या दुरुस्तीबाबत रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविलेले आहे. मात्र त्यांच्या अधिकाऱ्यांनी दोनवेळा येऊन फक्त पाहणी करण्याचे काम उरकले आहे. दुरुस्ती कधी होईल हा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक विचारत आहे.
सिटी स्कॅन बंद असल्याने खाजगी केंद्रांमध्ये सुमारे दोन हजार ते आठ हजार रुपयांपर्यत गोरगरीब रुग्णांना आर्थिक सोस सहन करावी लागत आहे. तर सोनोग्राफी विभागातही केवळ तीनच डॉक्टर उरले असल्याने ते रजेवर गेल्यास त्यांना पर्यायी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. यात सर्वाधिक गर्भवती महिला सोनोग्राफी करण्यासाठी येत असतात. अनेक महिला ग्रामीण भागातील अंगणवाडी, आरोग्य केंद्रातून येत असतात. त्यांना अनेकवेळा मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यकाळात प्रगतीपथावर असलेले हे शासकीय रुग्णालय आता अधोगतीच्या मार्गावर जात असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे.