भडगाव तालुक्यातील कनाशी येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कनाशी ता. भडगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे या बालकाचा ३० रोजी वाढदिवस साजरा होणार होता ; त्या आधीच दैवाने त्याला हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हर्षवर्धन महेंद्र महाले असे या मृत बालकाचे नाव आहे. कजगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील रहिवासी होता. (केसीएन)तसेच पाचोरा बस आगारात चालक महेंद्र महाले यांचा हर्षवर्धन हा मुलगा होता. तो कनाशी जि. प. शाळेत तिसरीत शिकत होता. हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता. गणवेश घालून घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी शेतात असलेली सायकल घेऊन शाळेत जाऊ या विचाराने तो शेताकडे गेला. त्याचवेळी शेतातील एक सिमेंटचा पोल या बालकाच्या अंगावर कोसळला आणि तो जागीच गतप्राण झाला.
हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच या बालकाच्या बचावासाठी ते धावले. रुग्णालयात त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. (केसीएन)हर्षवर्धन याचा शनिवार दिनांक दि. ३० रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. याची त्याने तयारी सुरू केली होती. दोन दिवसांपूर्वी वडील महेंद्र महाले यांच्यासोबत भडगाव येथे जाऊन त्याने कपडे खरेदी केले. वाढदिवसासाठी त्याने मोठा केकही मागवला होता. तसेच त्याने वडिलांकडे रिमोट असलेल्या कारची मागणी केली होती. त्याच्या या अचानक जाण्याने कनाशी गाव सुन्न झाले आहे.