जळगाव शहरातील विठ्ठल पेठ परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने कुठल्यातरी नैराश्यात येऊन साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली. दरम्यान, या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोकेश विलास अत्तरदे (२३, रा. विठ्ठलपेठ) असे मयत तरुणाचे नाव आहे. लोकेश याचे शिक्षण झाल्यानंतर तो कंपनीत काम करीत होता. त्याची आई शेती काम करते, बहीणीचे लग्न झाले असून वडील विलास अत्तरदे हे स्वयंपाकी आहे. ते उत्तरप्रदेशात लखनौ येथे स्वयंपाकी कामासाठी गेलेले आहे. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली होती. त्या मुळे तो घरात एकटाच होता. त्या वेळी त्याने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास या तरुणाचा १० वर्षीय चुलत भाऊ घरात लोकेशकडे पाणी मागण्यासाठी गेला त्या वेळी त्याला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहताच चिमुकल्याने शेजारच्या मंडळींना ही घटना सांगितली. शेजारील काही तरुणांनी लोकेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे सीएमओ डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्याला मयत घोषित केले.
या घटनेविषयी नातेवाईकांनी लोकेशच्या वडिलांना माहिती दिली. ते लखनौ येथून आल्यानंतर शनिवारी मयताचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लोकेशला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याने अत्तरदे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.