भुसावळ येथील रेल्वे स्टेशनला घडली घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : चाळीसगाव येथे नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी जाणारी महिला रेल्वेतून पडून जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयांत नेण्यात आले. मात्र उपचाराअभावी महिला मृत्युमुखी पडली असा आरोप नातेवाईकांनी केला. ही घटना गुरुवारी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकात घडली.

रेखा दीपक पाटील (वय ४०, गांधीनगर, भुसावळ) असे या मृत महिलेचे नाव आहे. रेखा पाटील यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, वहिनी व जेठ असा परिवार आहे. दि. २२ रोजी चाळीसगाव येथे नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारला जाण्यासाठी त्या आणि त्यांच्या वहिनी कामायनी एक्स्प्रेस समजून सीतापूर मुंबई (क्र. १२१०८) या रेल्वेगाडीत चढल्या.मात्र, त्याचवेळी ही गाडी चाळीसगावला न थांबता थेट नाशिककडे जाते, असे समजल्याने दोघांचा गोंधळ उडाला. या गोंधळात रेल्वे सुरू झाली आणि त्यातून उतरत असतानाच रेखा पाटील या रेल्वे गाडीखाली आल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेनंतर उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले; पण दिवाळी असल्यामुळे डॉक्टर उपलब्ध नव्हते. नंतर साकेगाव येथील ट्रॉमा सेंटरकडे नेण्यात आले. तिथे रेखा पाटील यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास लोहमार्ग पोलिस करीत आहेत.









