पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चोरवड दत्त महाराजांचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते . येथील यात्रोत्सवास भाविकांची मोठी गर्दी असते.मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रोत्सवाला सुरुवात होते. यंदा 18 तारखेपासून यात्रोस्तवास प्रारंभ होणार आहे.
चोरवड येथे सुमारे ४०० वर्षापासून दत्त जयंती साजरी केली जाते.चोरवडच्या पश्चिमेला दत्त महाराजांच्या दोन मंदिरात मुर्त्यांची इ.स.१६०२ मध्ये स्थापना करण्यात आली होती.रावजीबुवा नामक व्यक्ती गावाबाहेर वास्तव्य करत असे . बाबा महानुभाव भिक्षुकी असल्याने भिक्षुकी करून उदरनिर्वाह करीत .रावजी बुवा नियमित माहुरंगडाची वारी करीत उतरत्या वयात वारी शक्य न झाल्याने त्यांनी तसे देवासमोर सांगितले व त्यांच्या झोळीत दोन झेंडूची फुले आली.नंतर ते चोरवडला आले त्या फुलांचे रुपांतर दत्त मूर्तीत झाल्याची आख्यायिका आहे. मोठे दत्त मंदिर जवळपास १५० वर्ष छत नसताना उभे होते. मंदिराचे छत एकाच रात्री बांधले गेले असे सांगितले जाते. लहान मंदिरशेजारी औदुम्बराचे झाड असून यात्रेच्या निमित्ताने भूत उरे औदुंबराला बांधली जातात.खान्देशातून या मंदिरात दर्शनासाठी लोक चोरवड येथे मुक्कामी येतात.
मंदिर हे महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे एकमेव स्थान आहे. पालखी मिरवणुकीला खूप महत्व असते. आठवडाभर यात्रा चालते. या यात्रेसाठी पारोळा बसस्थानकावरुन जादा बसेस सोडल्या जातात परंतु यावर्षी संपामुळे बसेस येणार नाहीत .परिसरातील नागरिक यात्रेसाठी बैलगाडीनेच येणे पसंद करतात हे या यात्रेचे वैशिष्ट आहे. भाविकांना सरपंच , ग्रा प सदस्य, जि प सदस्य हर्षल माने व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असते. यावर्षी ग्रा पने परवानगी घेऊन यात्रेची तयारी केली आहे यात झुले ,पाळणे व तमाशा चोरवड येथे दाखल झाले असून ते यात्रेचे आकर्षण असते यात्रेच्या परवानगी व इतर सुविधासाठी माजी मंत्री डॉ सतीश पाटील, प्रांत विनय गोसावी , पो नि संतोष भंडारे यांचे सहकार्य मिळत असल्याचे सरपंच राकेश पाटील यांनी सांगितले.