जळगाव शहरात एमआयडीसी भागात घटना
जळगाव प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी परिसरातील टोलनाक्याजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर शनिवारी, ३ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरच्या साहाय्याने मशीन कापताना अचानक लागलेल्या आगीमुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. या आगीत मशीनमधील लाखो रुपयांच्या नोटा जळून खाक झाले आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली.
जळगाव-अजिंठा रस्त्यावरील एमआयडीसी भागात हे एटीएम केंद्र आहे. शनिवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी हे केंद्र गाठले. सुरुवातीला त्यांनी ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापण्यास सुरुवात केली. मशीनचा बराच भाग कापला गेला खरा, मात्र कटरच्या उष्णतेने आतील नोटांच्या बंडलनी पेट घेतला. धूर आणि आग दिसू लागताच चोरट्यांनी तेथून पळ काढला.
हा प्रकार एका रिक्षाचालकाच्या लक्षात आला. त्याने तत्काळ जवळच्या दुकानदाराला आणि पोलिसांना कळवले. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. या एटीएममध्ये काही दिवसांपूर्वीच एका खाजगी कंपनीने ११ लाख रुपयांची रोकड भरली होती. ग्राहकांनी काढलेली रक्कम वजा जाता, उरलेली किती रक्कम जळाली याचा आकडा स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ४ जण स्पष्ट दिसत असून ही एखादी आंतरराज्य टोळी असावी, असा पोलिसांचा संशय आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









