पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील आठवडे बाजार येथे गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने २६ हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनिवारचा बाजार असल्याने लिना पोतदार (रा. गांधी चौक, पाचोरा) ह्या भाजीपाला घेणेसाठी आठवडे बाजार, पाचोरा येथे गेल्या होत्या. लिना कल्पेश पोतदार यांच्या मालकीचा असलेला ११ हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्यांचेजवळ होता. दि. ८ रोजी शनिवारी सायंकाळी ०४. ०० वा. चे सुमारास भाजीपाला घेत असतांना त्यांचे हातामध्ये कापडी पिशवी होती. त्यात एक अबोली रंगाची मोबाईल ठेवण्यासाठी पर्स होती. दरम्यान बाजार जात असतांना लिना पोतदार यांची पिशवी कोणीतरी ओढत आहे असे जाणवले. सदर ठिकाणी एक इसम हा पळतांना दिसला. म्हणुन त्यांनी चोर-चोर आवाज दिल्याने तो गर्दीचा फायदा घेवुन पळून गेला.
त्यांनी आवाज दिल्याने त्यांचेकडे इतर लोक धावत आले. व त्यांना लिना पोतदार यांनी सदरची हकिगत कळविली. तेव्हा गर्दीतले इसम लालचंद दला बडगुजर (वय. ६४ वर्षे, रा. लोहारी, ता. पाचोरा) यांचा जयेश बडगुजर यांचे नावे असलेला ओप्पो कंपनीचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे २६ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याचे समोर आले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.