अमळनेर शहरातील चोरीप्रकरणी पोलिसांची १२ तासात कारवाई
अमळनेर ( प्रतिनिधी ) – शहरातील धुळे रस्त्यावरील अनुसया पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्याने ३४ लाख ६१ हजार रुपयांचा टिप्पर चोरून नेल्याची घटना दि.२५ रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान पोलिसांनी तातडीने पाठपुरावा करत अवघ्या १२ तासात टिप्पर मध्यप्रदेशातून शोधून आणला आहे.


अरुण पुंडलिक पाटील यांचा १६ चाकी टिप्पर (क्रमांक एमएच ४६ बीपी ७४१३) हा वाघोदे येथील चालक संतोष हिरामण जावरे याने वाळू भरण्यासाठी सकाळी नेला होता. वाळूची ट्रिप टाकल्यांनंतर त्याने टिप्पर धुळे रस्त्यावरील अनुसया पेट्रोल पंपावर लावला होता. दिनांक २६ रोजी सकाळी ६ वाजता चालक संतोष जावरे आणि राहुल राठोड टिप्पर काढायला पंपावर गेले असता त्यांना टिप्पर गायब झाल्याचे आढळून आले. योगेश गुलाब पाटील याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक मदत व गोपनीय माहितीच्या आधारे अमोल पाटील, निलेश मोरे, गणेश पाटील, प्रशांत पाटील या पोलिसांना टिप्परचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांनी पाठलाग करत मध्यप्रदेश गाठले. चोरट्याने टिप्पर बडवाणी जिल्ह्यातील निसारपूर गावाजवळ टिप्पर सोडून पळून गेला होता. पोलिसांनी तेथून टिप्पर ताब्यात घेतला. अवघ्या १२ तासात पोलिसांनी टिप्पर परत मिळवले. मात्र संशयित आरोपी फरार झाला आहे. मुद्देमाल परत मिळाल्याने पोलिसांच्या कारवाईबद्दल कौतुक होत आहे.









