जळगावात उच्चभ्रू भागात घडली घटना, पोलिसांना आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) : रस्त्याने पायी जात असलेल्या विद्यार्थीनीच्या हातातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोबाईल जबरीने हिसकावून नेला. ही घटना दि.१ रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रभात चौकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानिका अमोल पाटील (वय २०, रा. एरंडोल) ही तरुणी जळगाव शहरात शिक्षण घेत आहे. दि. १ रोजी दुपारच्या सुमारास ती रस्त्याने एम. जे. कॉलेज जवळून बस स्टॅण्डवर पायी जात होती. प्रभात चौकात मागून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी विद्यार्थीनीच्या हातातून मोबाईल जबरीने हिसकावून नेला. विद्यार्थीनीने आरडाओरड केली. मात्र तो पर्यंत चोरटे तेथून तेथून पसार झाले होते. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत तरुणीने लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मिलींद सोनवणे हे करीत आहे. दरम्यान, भुरटे चोर, सोनसाखळी, चोरांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर वचक बसविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.