अमळनेर शहरातील बाजारपेठेत घडली घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरात बुधवारी १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल सात ते आठ दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना सकाळी ७ वाजता समोर आली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अमळनेर शहराच्या मुख्य भागातील बाजारपेठेत चोरट्यांनी मध्यरात्री दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी ७ वाजता जेव्हा दुकानदार नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडण्यासाठी आले, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. दुकानांमधील सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली असून, रोख रक्कमेसह मौल्यवान साहित्य लंपास करण्यात आले आहे. चोरट्यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने एकापाठोपाठ एक दुकाने साफ केली. यात मयूर मोबाईल, सना इलेक्ट्रॉनिक, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक, पी. जी. टेलर्स, दुर्गा टी डेपो, सुविधा मोटर वायडिंग या नामांकित दुकानांसह अन्य काही छोट्या व्यवसायांचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या चोरीत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात घरफोडी व दुकान फोडून चोऱ्या करणाऱ्यांचे मोठे प्रमाण वाढले आहे.









