भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील फेकरी या गावात शुक्रवारी रात्री तब्बल सहा घरांमध्ये चोरट्यांनी डाका टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क झालेल्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने त्यांचा प्रयत्न फसला आहे. याबाबत भुसावळ पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात २९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सहा ठिकाणी घरफोडीच्या प्रयत्नांच्या घटना घडल्या आहेत. चोरी झाल्याचे कळताच नागरीकांनी घटनेची खबर पोलीस पाटील किशोर बोरोले यांना दिली. घटनास्थळी पो.नि.बबन जगताप, सहा.पोनि.अमोल पवार यांच्यासह श्यामकुमार मोरे, पो.हवलदार प्रेमचंद सपकाळे,योगेश पालवे यांनी घटनेचा पंचनामा केला. सहाही घरांमधून कोणत्याच प्रकारचा मुद्देमाल गेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जळगाव येथील श्वानपथक हजर झाले असता श्वानपथकाने चोरट्यांचा जाण्याचा मार्ग नॅशनल हायवे क्र.६, फेकरी बंद टोलनाक्याकडे दाखवला. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
फेकरी गावातील संतोष कवटे, यशवंत बऱ्हाटे, सुरज मोरया, विनोद बोरोले व संस्कृतीनगर येथील सुभाष तायडे, व प्रकाश मोरे यांच्या घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडत कपाटातील व घरातील सामान अस्ताव्यस्त केला. चोरी करतांना चोरट्यांनी शेजारील रहिवाशांच्या घराचे दार बाहेरुन कडी लावून बंद केले होते. पण शेजारचे नागरिक जागी झाल्याचे समजताच चोर पसार झाले. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.