अमळनेर पोलिसांनी चार तासात मुद्देमालासह केले गजाआड
अमळनेर (प्रतिनिधी) :- कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात शहरातील न्यायालयात आलेल्या एका भामट्याने न्यायालयाच्या आवारातच लावलेली दुचाकी चोरून नेली. तर अमळनेर पोलिसांनी दुचाकीसह अवघ्या चार तासात त्याला अटक करण्यात यश मिळवले.
जयपाल इंदरसिंग राजपूत (रा. गणपूर, ता. चोपडा) हे दि. ९ ऑक्टोबर रोजी अमळनेर न्यायालयात त्यांच्या कामानिमित्त आले होते. त्यांनी एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच -१९-डीपी-४५४१) न्यायालयाच्या गेटजवळ पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, काही वेळातच चोरट्याने ती मोटरसायकल चोरून नेली. या प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, गुन्हे अन्वेषण पथकातील हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, कॉन्स्टेबल विनोद सनदनशिव, उदय बोरसे यांनी तात्काळ तपास सुरू केला.
पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या ४ तासांत आरोपीला पकडून मोटरसायकल जप्त केली. आरोपीचे नाव धनंजय रवींद्र पाटील (रा. विद्यानगरी, देवपूर, धुळे) असे आहे. तो यापूर्वीही धरणगाव पोलीस ठाणे हद्दीतील बुलेट मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक झाला होता. या वेळेस तो कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात न्यायालयात आला होता. कामकाज आटोपल्यावर त्याने मास्टर कीच्या सहाय्याने पार्किंगमधील मोटरसायकलचे लॉक उघडून चोरी केली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.