भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यात वरणगाव शहरातील सुशील नगर, दर्यापूर परिसरात एका तरुणाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिध्दार्थ अशोक थाटे (वय २०, रा. सुशील नगर, दर्यापूर, वरणगाव) हा तरुण कुटुंबासह वास्तव्यास आहेत. थाटे कुटुंब ७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या सुमारे महिनाभराच्या कालावधीत काही कामानिमित्त घराबाहेर होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी ७ नोव्हेंबरनंतर मोठ्या शिताफीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील गोदरेज कपाट तोडून किंवा उघडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे सर्व दागिने चोरून नेले. चोरलेल्या ऐवजाची एकूण किंमत अंदाजे २ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे.
थाटे कुटुंब मंगळवारी, ९ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरी परतले, तेव्हा त्यांना घराचे दरवाजे उघडे आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच सिध्दार्थ थाटे यांनी तातडीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सिध्दार्थ थाटे यांच्या फिर्यादीनुसार, वरणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे.









