जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : चोरलेल्या दुचाकीवर स्वतःची ओळख लपवून फिरणाऱ्या संशयिताला एलसीबीच्या पथकाने तपास चक्र फिरवून कल्याण होळ (ता. धरणगाव) येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या तब्बल चार दुचाकी असा सुमारे १ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढते गुन्हे लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वाहन चोरीतील संशयितांचा शोध घेऊन कारवाई करा, असे निर्देश एलसीबीला दिले होते. त्यानुसार त्यांच्या पथकाने तपासाला वेग देत कारवाई केली. करण लक्ष्मण गायकवाड (रा. कल्याण होळ) असे संशयिताचे नाव आहे. तो स्वतःची ओळख लपवून चोरीच्या दुचाकीवर फिरत पोलिसांना चकवा देत होता. त्याच्या बद्दल गोपनीय माहिती प्राप्त होताच पथकाने कल्याण होळ गाठत त्याला ताब्यात घेतले.
त्याचा साथीदार गोपाल सुरेश भिल (वय २२,रा. वराड ता. चोपडा) यालाही ताब्यात घेतले. करण याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. चोपडा ग्रामीण एक, चोपडा शहर हद्दीतून दोन दुचाकी त्याने चोरी केल्याची कबुली दिली. अन्य एक दुचाकी कोठुन चोरली होती, याचा शोध पथक घेत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनि राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, महेश सोमवंशी यांनी ही कारवाई केली.