एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यामध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मेहरूण येथील युनुस् राणानि अपार्टमेंट येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद हरून अब्दुल कदिर खटिक (वय ४३) हे मेहरूण येथे युनूस राणानि अपार्टमेंटमध्ये राहतात. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. २३ मे रोजी रात्री ११ वाजेनंतर ते ३१ मे च्या दरम्यान कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घरफोडी केली.
या ठिकाणी एक लाख रुपये नगद आणि सोन्या चांदीचे दागिने असे मिळून ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यामुळे मोहम्मद हरुण यांनी १ जून रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय दीपक जगदाळे करीत आहेत.