जळगावात महामार्गावरील घटना, ४ चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव प्रतिनिधी : भुसावळ रोडवरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात चोरट्यांनी शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी महाविद्यालयाच्या आस्थापना विभागातील चार केबिन्स फोडून तब्बल ११ लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिवाळीनिमित्त सुट्टीमुळे काही कार्यालये बंद होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री संस्थेत प्रवेश केला. शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही चोरी केली. चोरट्यांनी आस्थापना विभागातील चार केबिन्सची कपाटे फोडली आणि त्यामध्ये ठेवलेली सुमारे ११ लाख ८५ हजारांची रोकड लंपास झाली आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असल्याने लवकरच त्यांना अटक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये एकूण चार चोरटे चोरी करताना स्पष्टपणे दिसून आले आहेत.सकाळी ६:३० वाजता साफसफाईसाठी शिपाई आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.









