चोपडा तालुक्यातील अनवर्दे येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या अनवर्दे बुधगाव येथील पी. टी. एस. विद्यालयातून अज्ञात चोरट्यांनी ३१ हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली. मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालयात संगणक, टेबल खुर्ची, सोलर बॅटरी, फॅन अशाप्रकारचे विविध साहित्य आहे. सर्व शिक्षक, शिपाई हे दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी शाळेचे दैनंदिन काम आटोपून घरी गेले. दुसऱ्या दिवशी शाळेतील शिपाई प्रकाश दादागीर गोसावी यास गावातील शेतकरी नवल मुरलीधर वाघ यांनी शाळेचे आवारात केबल वायर पडलेली असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले. त्यावरून मुख्याध्यापक बळवंत भिकनराव सोनवणे यांना कळविल्यावरून ते शाळेचे आवारात आले असता केबल वायर तुटुन पडलेली दिसली. तसेच ट्यूबवेलचे पाईप तोडुन नुकसान केलेले दिसले.
शाळेतील खोल्या पाहिले असता शाळेतील शिक्षक दालनातील सोलर बॅटरी, छोटा फॅन, ट्यूबवेल स्टार्टर, परिसरातील ट्यूबवेलमधील तीन एच.पी. मोटर असा ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे आढळून आले. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.