यावल तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी शिवारातून वीज वितरण कंपनीच्या लघु दाबाच्या विजेच्या तारांची चोरी झाली असून अज्ञात चोरट्याविरुध्द यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकळी शिवारातील मनवेल येथील अनिल श्रावण पाटील गट न. २८२ व २७२, संजय मच्छिद्र पाटील व सुभाष सोनार यांच्या शेतातील विजेच्या तार चोरट्यांनी चोरुन नेल्याने विज पुरवठा खंडित झाला आहे. साकळी शिवारात शेतीपंपाना वीज कनेक्शन देण्यासाठी वीज वितरण कंपनीने खांब उभे करून त्यावर लघुदाबाचे तार टाकले होते. यापैकी २३ खांबांवरील ५५२० मीटर लांबीचे लघु दाबाचे तार अज्ञात चोरट्यांनी दि. १२ जूलैच्या मध्यरात्रीनंतर लांबवले. त्यांची किमत ७४ हजार ४१७ रुपये आहे. तार चोरी झाल्यामुळे शेतीपंपांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. साकळी कक्षाचे प्रधान तंत्रज्ञ नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली. तपास हवालदार सिंकदर तडवी करत आहे.