चोपडा (प्रतिनिधी) :- येथील एसटी महामंडळाच्या आगारातील वाहक व चहार्डी रहिवासी दीपक खैरनार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. त्यांनी एसटी बसमध्ये पाकीट राहून गेलेल्या प्रवाशाला त्याचे पाकीट परत दिल्यामुळे आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
दीपक खैरनार हे सध्या येथील बस डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना चोपडा आगाराची बस पुण्याहून परत येण्याची निघाली. या बसमध्ये रस्त्यात चाकण येथून काही प्रवासी बसले. अनावधानाने बाळासाहेब कर्डिले या प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्येच राहून गेले. त्यांच्या हे लक्षात न येता ते बाभळेश्वर येथे उतरले.
काही वेळानंतर बस तपासणी करताना वाहक दीपक खैरनार यांच्या हाती हे पाकीट लागले. त्या पाकिटात १५ हजार रुपये रोख व काही महत्त्वाची कागदपत्रे होती. दीपक खैरनार यांनी क्षणाचाही विचार न करता, ते पाकीटातील कागदपत्रांवरुन कर्डिले यांच्याशी तत्काळ संपर्क केला व त्यांना शिर्डी बस स्थानकात बोलवले. तेथील आगार प्रमुखांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात पूर्ण रक्कम असलेले पाकीट व कागदपत्रे सुपूर्द केली. दीपक खैरनार यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.